पिंपरी , १६ ( punetoday9news):- कोरोनामुळे काही युवा महिला विधवा झाल्या . त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी विविध उपक्रम आणि योजना महानगरपालिकेने हाती घेतल्या असून महिला सक्षमीकरणासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे असा विश्वास महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केला.
कोरोनामुळे पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या १८ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाची सुरुवात आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाली त्यावेळी त्या बोलत होत्या . पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी आयुक्त राजेश पाटील , नगरसदस्या अनुराधा गोरखे , सुजाता पालांडे , अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ , उपआयुक्त अजय चारठाणकर , समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे , सिंबायोसिस विद्यापीठाच्या मुख्य संचालिका डॉ . स्वाती मुजुमदार , सिंबायोसिस स्किल्स ॲड प्रोफेशनल विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ . अश्विनीकुमार शर्मा आदी उपस्थित होते . कोरोनामुळे पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या शहरातील गरजू महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उमेद जागर हा कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे . या उपक्रमा अंतर्गत सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने एकूण १४ कोर्सेस राबविण्यात येणार आहेत . यापैकी ३ कोर्सेस आजपासून सुरु करण्यात आले . या प्रशिक्षण उपक्रमासाठी ५०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला असून ५० महिलांची पहिली बॅच आजपासून सुरु करण्यात आली तर ८ दिवसांनी दुसरी बॅच सुरु होणार आहे .
उमेद जागर उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेवून काही महिला स्वतःच्या पायावर उभ्या होत आहेत हे पाहून समाधान वाटत आहे असे सांगून महापौर माई ढोरे म्हणाल्या कोरोनामुळे पती गमाविलेल्या महिलांना आर्थिक मदती बरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे . आजचा हा कौशल्य प्रशिक्षणाचा दिवस महिलांसाठी नवी उमेद घेवून आला आहे . या उपक्रमामध्ये महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांनी सुरु केलेल्या उद्योगातील उत्पादित वस्तूंच्या मार्केटिंगची जबाबदारी देखील सिंबायोसिसतर्फे घेण्यात येणार आहे . उमेद जागर या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होण्याचा रस्ता दाखविण्याचे काम महानगरपालिकेने केले आहे . गरजू महिलांनी या कौशल्य प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण करावा असे ही त्या म्हणाल्या . आयुक्त राजेश पाटील म्हणाले , उमेद जागर हा उपक्रम महिलांना सन्मानाने उभे करणारा उपक्रम आहे . कोरोनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले . अशा परिस्थितीमध्ये केवळ आर्थिक मदत करून अडचणी संपत नाहीत याची जाणीव असल्याने हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले . यासाठी सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने देखील पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले . गरजू महिलांना आणि मुलामुलींना व्यवसायाभिमुख तसेच रोजगार देणारे प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका सिंबायोसिस विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे . ज्या महिला आज या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत त्यांनी यशस्वी जीवनाकडे पहिले पाऊल टाकले असून ते इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असेही आयुक्त पाटील यावेळी म्हणाले . सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य संचालिका डॉ . स्वाती मुजुमदार म्हणाल्या , सिंबायोसिस विद्यापीठामधून हजारो महिला प्रशिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत . या उपक्रमामधून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळावी याकरिता मार्केटिंग कंपन्यांशी संलग्नता करण्यात आले आहे . हे कोर्स पूर्ण केल्यानंतर महिलांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला . यावेळी कौशल्य प्रशिक्षण घेवून रोजगार मिळवलेल्या रेश्मा कांबळे व शितल दलदरे यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त अजय चारठणकर यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मानले .
Comments are closed