खंडाळा, दि. १९ ( punetoday9news):- सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील रामेश्वर विद्यालय विंग मध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३१ वर्षानंतर हे दहावीच्या १९९० च्या बॅचचे विद्यार्थी एकत्र आल्याने अनोखा आनंददायी असा एक वर्गच भरला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. प्रास्ताविक संजय तळेकर, अध्यक्ष निवड विजय बांदल, अनुमोदन हंबीरराव महांगरे तर शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा परिचय साहेबराव तांगडे यांनी दिला.
या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी साहेबराव तांगडे अणि वैजयंता शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे विजय बांदल, दत्तात्रय तळेकर, संजय तळेकर, संतोष तळेकर, वर्षा महांगरे, शशिकला राऊत व अमिता गुजर यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
सर्व सन्मानित गुरुवर्य यांना स्मृतिचिन्ह, शाल व छोटेसे रोप देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कायमची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व लेखणी देण्यात आली. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रामेश्वर विद्यालय विंगचे मुख्याधयापक कदम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वखुषीने जमा केलेल्या वर्गणीतून करोनामध्ये आई-वडील गमावलेल्या दोन विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक खर्च पुरेल एवढी देणगी व शाळेस भेटवस्तू देण्यात आली.
याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना व शिक्षकांच्या अनुभवांना उजाळा दिला यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी भारावून गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खुस्पे सर यांनी मनोगत व्यक्त करताना आहार व व्यायाम याचे महत्व पटवून दिले.ते म्हणाले, ”जे कच्चे आहे ते भाजून खाऊ नका .जे भाजलेले आहे ते शिजवून खाऊ नका .शिजवलेले आहे ते तळून खाऊ नका आणि जे तळलेले आहे ते कधीच खाऊ नका.”
संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेखा व नीटनेटके आणि विनोदी , हसतखेळत वातावरण तयार करून साहेबराव तांगडे यांनी सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमातील सर्वांचे आभारही मानले . स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाल्याबद्दल परिसरातून सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट पायंडा पाडल्याबद्दल ही अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments are closed