पिंपरी, दि. ३०( punetoday9news):- अज्ञान, अंधश्रध्दा आणि अनिष्ट रुढी परंपरेतून बाहेर पडून शिक्षण आणि विज्ञानाकडे जाण्यासाठी प्रसंगी विद्रोह करुन मुलींनी स्वत:चे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवावी असा आशय असलेली “बन पोरी बन, लेखणी बन, सावित्री फुलेची लेखनी बन” ही कविता सादर करुन कवी भगवानराव गरड यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनोखी आदरांजली अर्पण केली. भगवानराव गरड यांनी सादर केलेल्या एक गांव या कवितेला रसिकांनी उभे राहून दाद दिली. आरं माणसा माणसा, नको करु भेदभाव, तुझं माझं जगण्याचं, हाय एक गांव असा समतेचा संदेश गरड यांनी कवितेतून दिला. ग्रामीण भागातून आलेल्या गरड यांनी सहज सोप्या भाषेत ग्रामीण ढंगातील कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.
निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कविसंमेलनाचे. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये झालेल्या या कविसंमेलनात सागर काकडे, सुमित गुणवंत, जित्या जाली, संतोष शिंदे, निलध्वज माने, संतोष जोगदंड, सुनिल खळदकर, राजू साळवे आणि भगवानराव गरड यांनी सहभाग घेतला होता.
निलध्वज माने यांनी “बुध्दा” ही कविता सादर केली. तू अखंड मानव जातीतील सुख आणि दु:खाचा शोध घेतलास कसा ? असा प्रश्न करुन मानवाच्या हिंस्त्र, लोभी आणि विषमतावादी प्रवृत्तीविरुध्द लढण्यासाठी बुध्दाच्या तत्वज्ञानाची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत केले. तर नामदेवा या कवितेतून अन्यायाविरुध्दचा विद्रोह शांत झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बोलतो मी रोखठोक मला नाही मान्य मानवनिर्मित देव, तो तुझ्यापाशीच जपून ठेव असे सांगत कवी जित्या जाली यांनी अंधश्रध्दा आणि कर्मकांडावर प्रहार केला. राजू साळवे, संतोष जोगदंड यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची महिमा कवितेतून सादर केली.
शाळा म्हणजे आपल्यासाठी कधीच नव्हता तुरुंग, अज्ञान आणि विषमतेला लागतो येथे सुरुंग या सुनिल खळदकर यांच्या कवितेला रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यांनी सादर केलेल्या आधुनिक सावित्रीच्या सद्यस्थितीच्या मांडणीला देखील उपस्थितांनी प्रतिसाद दिला. संतोष शिंदे यांनी प्रिय कोरोना व्हायरस या कवितेतून जाती धर्माबद्दल गर्विष्ठपणा बाळगणा-यांना आणि अंधश्रध्देच्या वाहकांना कोरोनाने चपराक देवून विज्ञानापुढे झुकायला लावले, असा परखड विचार आपल्या कवितेतून मांडला. समतेचा विचार पेरणा-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीवर भाष्य करताना सागर काकडे यांनी तुमच्या एका गोळीवर माझं सुध्दा नाव लिहा ही कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, संविधानाचा संघर्ष या कविता सुमित गुणवंत यांनी सादर केल्या. मराठी माणसाच्या हृदयात फक्त भगवाच असतो असे कवितेतून सांगत हा भगवा रंग तथागत बुध्दांच्या चिवराचा, छत्रपती शिवरायांच्या भगव्या झेंडयाचा आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पॅलेसवरील भगवा असल्याचे सुमित गुणवंत यांनी सांगितले.
कविसंमेलनानंतर वंदन क्रांतीज्योतीला हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. प्रज्ञा इंगळे, विशाल ओव्हाळ, स्वप्निल पवार, संकल्प गोळे, शेखर गायकवाड, धीरज वानखेडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारीत विविध प्रबोधनात्मक गीते सादर केली.
Comments are closed