पुणे दि.3( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी शेड उभारणीस अर्थसहय्य, 100 कुकुट पिलांचे वाटप, 25+3 तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे किंवा गुगल प्ले-स्टोअरवर एएच-महाबीएमएस हे ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲप उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारण्यात येतील.

वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी व शासनाकडे एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील 5 वर्षांसाठी लागू ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालाय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!