मराठवाडा जनविकास संघातर्फे दिव्यांगांचा गौरव.
पिंपरी, दि. ( punetoday9news):- जागतिक दिव्यांग दिनासारख्या दिवसांमुळे अशा व्यक्तींच्या संघर्षाची नोंद घेण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळते. लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील सर्व घटकांसोबत दिव्यांग व्यक्तिचे स्थानदेखील महत्त्वाचे आहे. त्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न सर्व स्तरातून होणे आवश्यक आहे, असे आवाहन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघातर्फे चाळीस दिव्यांग कुटुंबांना ब्लँकेट, सॅनीटायजर, मास्क व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. चिंचवडमधील दिव्यांग प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, उद्योजक शंकर तांबे, ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला ढोरे, कोमल कवडे, छाया भदाणे उद्योजक परमेश्वर बिरादार, गोरक्ष सानप, उद्धव सानप आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अरुण पवार म्हणाले, समाज अनेक प्रकारच्या विविधतांनी नटलेला आहे. त्यात कोणी स्त्री-पुरूष आहे, तर कोणी काळा गोरा, कोणी सुदृढ आहे, तर कोणी दिव्यांग ! माणूस कसाही असला, तरी तो मानवी समाजाचा एक महत्त्वाचा हिस्सा असतो आणि समाजातील प्रत्येक घटकाचे विशेष महत्त्व असते. शिवाय समाजातील कोणताही एक घटक उपेक्षित राहिला, तर समता प्रस्थापित होऊ शकणार नाही. समाजातील दिव्यांग बांधव आपलेच आहेत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात निर्माण होणार नाही, तोपर्यंत समतोल समाजाचे ध्येय साध्य होणार नाही. दिव्यांगांनाही स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत, स्वतंत्र भावना आहेत. या जगात आपला ठसा उमटवण्याकरता त्यांना आपल्या सहकार्याची आणि प्रेमाची गरज आहे.
Comments are closed