पिंपरी ,दि . १२ ( punetoday9news):- ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी दाखल झालेल्या विविध राज्यातील खेळाडुंनी चमकदार कामगिरी करुन आपल्या संघासाठी यश मिळवुन द्यावे, क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला प्रतिसाद देऊन खेळाडुंना प्रोत्साहीत करावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित ११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चे उद्घाटन आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले , त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करुन स्पर्धा सुरु झाल्याची उद्घोषणा महापौर माई ढोरे यांनी केली.
मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्यासह उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, माजी ऑलिम्पियन हॉकी खेळाडु रुपींदरपाल सिंग, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या शारदा बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी इंडियाचे सहसचिव फिरोज अन्सारी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सरचिटणीस मनोज भोरे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माझी वसुंधरा ही पर्यावरण जागृती विषयक शपथ घेण्यात आली.
११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मध्ये होणा-या एकुण ५० सामन्यांमध्ये एकुण ३० राज्यांच्या संघांमधील ७५० खेळाडू सहभागी झाले असून ४० पंच, ८ सिलेक्टर, १० पदाधिकारी व ९० स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहत आहेत.
Comments are closed